मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील एका खासगी कौटुंबिक समारंभात हे दोन्ही नेते भेटले होते, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचा एक फोटो देखील समोर आला आहे.

आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात ही भेट झाल्याचे समोर आले आहे. नार्वेकर हे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव आहेत. नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही असल्याने राऊत कुटुंब या सोहळ्यासाठी आले होते. मुख्यमंत्री फडणवीससह अनेक मंत्र्यांनी या विवाह सोहळ्यात उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात सुमारे 20 मिनिटे संवाद झाला. राऊत यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बरी नव्हती दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि उपचारांबाबत माहिती घेतली. दरम्यान, या भेटीत कोणत्याही राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही भेट केवळ वैयक्तिक आणि सामाजिक स्वरूपाची असल्याचे स्पष्ट होते.







