Devendra Fadnavis : भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडत जनतेला थेट आवाहन केले. कथित भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास ती शासनापर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. “या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना अशी शिक्षा होईल की भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीस यांनी या निमित्ताने समाजातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सूक्ष्म फरक अधोरेखित केला. “आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यामध्ये जशी एक पातळ रेषा असते, तशीच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्येही आहे. ती ओलांडली की विवेक हरवतो,” असे ते म्हणाले. या प्रकरणामुळे समाज कोणत्या दिशेने जात आहे, याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या संत परंपरेचा संदर्भ देत त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत गाडगेबाबा यांसारख्या संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध केलेल्या कार्याची आठवण करून दिली. “देवत्व हे माणुसकीत आहे, इतरांच्या कल्याणात आहे,” हा संदेश त्यांनी पुन्हा अधोरेखित केला.
दरम्यान, 1 महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी. फडणवीस यांनी सांगितले की, या कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्णपणे लागू होतील. मात्र, नियम प्रलंबित असले तरी कायद्याच्या कलम 3 अंतर्गत कारवाई करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीसा बोलताना म्हटले की, “जर जादूटोण्याने समस्या सुटल्या असत्या, तर युद्ध ड्रोनऐवजी लिंबू-मिरचीने लढलो असतो.” या वक्तव्यातून त्यांनी अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केला.







