लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांच्या मित्रानेच एका 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या नराधम आरोपीला अवघ्या 7 तासांत अटक केली आहे. (Uttar Pradesh Crime News)

ही घटना लखनऊच्या इंदिरानगर परिसरात शनिवारी (22 नोव्हेंबर) ला रात्री उशिरा घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील आणि आरोपी दोघेही मित्र आहे. ते मुळचे बिहारचे रहिवासी आहेत. दोघेही एकत्र शटरिंगचे काम करतात. शनिवारी रात्री आरोपी पीडित मुलीच्या घरी आला आणि त्याने तिच्या वडिलांसोबत दारू प्यायली. दारू पिल्यानंतर आरोपीने मित्राला, म्हणजेच मुलीच्या वडिलांना, ‘मी मुलीला खेळायला बाहेर घेऊन जातो,’ असे सांगितले. मुलीला सोबत घेऊन गेल्यानंतर घरापासून काही अंतरावर नेऊन आरोपीने तिच्यावर हे घृणास्पद कृत्य केले आणि घटनास्थळावरून तो पळून गेला.
मुलीने सांगितली आपबिती
त्यानंतर पिडीत मुलगी रडत घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना आरोपीने केलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितलं. हे ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पीडित मुलीला सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले आणि नराधम आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
सदर पीडित मुलीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
7 तासांत आरोपीला बेड्या
या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 7 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.







