Crime News: उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंडा शहरातील गायत्रीपुरम परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय अभिषेक श्रीवास्तव याने आपल्या घरात आत्महत्या केल्याची घटना 17 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. अभिषेक बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्याच्या बहिणीला संशय आला. तिने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता अभिषेकचा मृतदेह आढळून आला. Uttar Pradesh Crime

घटनास्थळ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अभिषेकचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. खोलीतील भिंतींवर एका महिलेचे फोटो, मोबाईलवरील चॅट्सचे स्क्रीनशॉट आणि काही लिहिलेली कागदपत्रे लावलेली दिसून आली. या सर्व बाबींमुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
अभिषेक श्रीवास्तव हा मूळचा गोंडा शहरातील रहिवासी होता. त्याने बीटेक आणि त्यानंतर एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. तो एका पेंट कंपनीत नोकरी करत होता. आई-वडिलांचे पूर्वीच निधन झाले असल्याने तो आपल्या धाकट्या बहिणीसोबत राहत होता. घर आणि बहीण हेच त्याचे संपूर्ण कुटुंब होते.
अभिषेकच्या घरासमोर सोनल सिंह ही तिच्या पती अजित सिंहसोबत राहत होती. ओळखीमधून दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि पुढे ही ओळख जवळिकीमध्ये बदलली, असे नातेवाईकांनी सांगितले. अभिषेकने तिच्यावर विश्वास ठेवून तिला भेटवस्तू आणि आर्थिक मदत केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
काही काळानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले. या वादातून अभिषेकवर खोटे आरोप करण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे अभिषेकला काही दिवस जेलमध्ये जावे लागले. जामिनावर सुटका झाली तरी बदनामी, मानसिक तणाव आणि दबाव यामुळे तो खचला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूमागील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.






