पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री (Maharashtra Budget 2026) अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राज्याची आर्थिक जबाबदारी खांद्यावर घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. “हे बजेट माझे सहकारी अजितदादांनीच तयार केले होते, मी केवळ मांडत आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. अजित पवार आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे गेल्या दशकातील एक अतूट समीकरण होते. 11 वेळा दादांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. यंदाही त्यांनी बहुतांश तयारी पूर्ण केली होती. मात्र, नियतीने त्यांना हिरावून नेले. “माझं अंतःकरण आज जड झालं आहे. दादांच्या करड्या स्वभावामुळे राज्याच्या तिजोरी सुरक्षित राहिली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, फडणवीसांनी अर्थसंकल्प आपल्या दिवंगत सहकाऱ्याला म्हणजेच अजितदादांना समर्पित केला.

अजितदादांचा स्वभाव हा मुळातच अभ्यासू आणि कामाचा उरक असलेला. यावेळचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी दादांनी गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस एक करून प्रत्येक विभागाचा सखोल अभ्यास केला होता. राज्याच्या तिजोरीचा कणा असलेला शेतकरी पुन्हा उभा राहावा, ही त्यांची तळमळ होती. म्हणूनच, त्यांनी अत्यंत बारकाईने विचार करत ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे, त्यांना या ओझ्यातून पूर्णपणे मुक्त करण्याचा विचार दादांनी केला होता. दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांनी घेतलेला हा कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारा ठरला आहे.
शेतकऱ्यांसाठी यंदा मोठे दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. यांतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल, तर नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळेल. तसेच गोपीनाथ मुंडे अपघात योजने अंतर्गत आता शेतमजुरांनाही संरक्षण मिळणार आहे.
अजितदादांच्या नजरेतून पुण्याचा विकास कधीच सुटला नाही आणि पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी अत्यंत बारकाईने आराखडा तयार केला आहे. शहराच्या वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी 5,100 कोटींच्या प्रकल्पास मान्यता मिळाली असून, याचा सर्वाधिक फायदा पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना होणार आहे. मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार करताना खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि रामवाडी ते वाघोली या 11 किमीच्या मार्गाला हिरवा कंदील मिळाला असून, हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड या उपमार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किमीच्या दुहेरी मार्गाचे नियोजन सुरू आहे.
रस्ते विकासाबाबत बोलायचे झाले तर, पुणे ते शिरूर 53 किमीचा 7,514 कोटींचा प्रकल्प, तळेगाव-चाकण उन्नत मार्ग (Elevated Road), चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत दरम्यान सहा पदरी रस्ता तयार करणार यामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासासाठी शिरूर ते संभाजीनगर या 192 किमीच्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, देहू येथील संत तुकाराम महाराज पवित्र स्थळाच्या विकास आराखड्याचीही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात आरोग्याला प्राधान्य देत व्यसनाधीनतेवर लगाम घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे आता स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे हजारो रुग्णांना आधार मिळेल. यासोबतच सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सौर पॅनेल, खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य आणि रुग्णालयांसाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे यांच्या किमतीत घट करण्यात आली आहे. याउलट, परदेशी व देशी मद्य (दारू), सिगारेट आणि विडी तसेच सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक कर लावण्यात येणार असल्याने ते महाग होणार आहेत.
राज्यासाठी महत्त्वाच्या घोषणा
ऐतिहासिक वारसा: महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विशेष निधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगडमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामसमृद्धी अभियान राबवणार
अजितदादांना श्रद्धांजली: दादांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारणार असून, त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सन्मान’ पुरस्कार सुरू केला जाईल.
रस्ते आणि रेल्वे: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करून 30 हजार गावे जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी विशेष तरतूद
रोजगार: नव्या गुंतवणूक धोरणातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट.
पायाभूत सुविधा: राज्यात 1,200 किमीचे मेट्रो जाळे आणि 6,000 किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार.
डिजिटल क्रांती: मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु होणार तसेच राज्यात 295 हून अधिक गेमिंग स्टुडिओंची निर्मिती.
कनेक्टिव्हिटी: दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गाशी जोडणार.
नैसर्गिक शेती: आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात.
लाडकी बहीण: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अखंड सुरू राहणार असून त्यासाठी भरीव तरतूद.
स्टील हब: गडचिरोलीत ‘स्टील हब’ सुरु करणार.
पर्यटन: सातारा वासोटा किल्ल्यावर रोप-वे आणि रामटेक येथे तिसरी चित्रसृष्टी.
अटल सेतू विस्तार: अटल सेतू थेट मुंबई विमानतळाला जोडला जाणार.
यंदाच्या अर्थसंकल्पात अजितदादांचे व्हिजन आणि देवेंद्र फडणवीसांच्या कामाची गती यांचा संगम यात पाहायला मिळतो. कर्करोगावरील औषधे स्वस्त करून सरकारने संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे, तर पायाभूत सुविधांवर दिलेला भर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. दरम्यान, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल.







