तेहरान: मध्यपूर्वेतील संघर्ष चांगलाच पेटला (Iran War) असतांनाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका अत्यंत वादग्रस्त विधानाने पेटलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इराणचे आर्थिक कणा मानले जाणारे ‘खार्ग बेट’ अमेरिकेने उद्ध्वस्त केल्याचा दावा करत, ट्रम्प यांनी “आम्ही मनोरंजनासाठी (Just for fun) पुन्हा तिथे हल्ला करू शकतो,” असे भाष्य केलं आहे. राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यामुळे इराण कमालीचा खवळला आहे.

ट्रम्प यांच्या धमकीला इराणने क्षेपणास्त्रांनी उत्तर दिले आहे. इराणने आपला आक्रमक पवित्रा बदलत आता थेट युएई (UAE), बहरीन आणि कुवेतमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक तीव्र झाला आहे. इराणच्या या पावलामुळे हा संघर्ष आता केवळ ‘इराण विरुद्ध इस्रायल’ न राहता ‘इराण विरुद्ध अमेरिका’ अशा थेट संघर्षात रूपांतरित झाला आहे. या युद्धात अमेरिकेलाही मोठी किंमत मोजावी लागत आहे.
खार्ग बेट हे इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. ते उद्ध्वस्त होणे म्हणजे इराणची आर्थिक नाडी कापण्यासारखे आहे. ट्रम्प यांची आक्रमक भाषा कदाचित देशांतर्गत राजकारणासाठी असू शकते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ती जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभी करत आहे. मध्यपूर्वेतील या तणावाचा थेट परिणाम भारतावरही होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतात इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे.







