Iran Gas Grid Attack : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता 24 दिवस पूर्ण झाले आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करून तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे प्रत्यक्ष लष्करी कारवाया मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीत. या संघर्षात आता एक मोठी घडामोडी समोर आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या ऊर्जा आणि वीज प्रकल्पांवर होणारे हल्ले 5 दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यांनी तेहरानसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला असला तरी इराणने मात्र असा कोणताही संवाद झाला नसल्याचे स्पष्ट करत ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवरील कारवाई सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीकडे जगाचे लक्ष लागले आहे. या मार्गातून मोठ्या प्रमाणावर जागतिक तेल वाहतूक होते, त्यामुळे जहाजांच्या सुरक्षेबाबत अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.
सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री इराणमधील खोर्रमशहर आणि इस्फाहान या औद्योगिक शहरांवर हल्ले झाले. या हल्ल्यांमुळे वीज आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. एका गॅस पाइपलाइनला नुकसान झाल्याने खोर्रमशहरमधील वीज निर्मिती पूर्णपणे बंद पडली. स्फोट इतका मोठा होता की त्याची ज्वाला दूरवरून दिसत होती.
या संघर्षाचा परिणाम शेजारील देशांवरही होत आहे. कुवेतमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखताना झालेल्या स्फोटामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच परिस्थिती तणावपूर्ण असून पुढील काही दिवसांत काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच संपूर्ण आखाती देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून पुढील काही दिवसांत हा संघर्ष कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.







