अहमदाबाद: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय क्रिकेट (Ind vs SA Super 8) चाहत्यांच्या भावनांचा तुटलेला धागा हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2023 च्या वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची जखम अजून भरून निघाली नसताना आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव करत सेमीफायनलच्या समीकरणांना मोठा धक्का दिला. या निकालानंतर या मैदानावरील भारताच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. (Cricket News)

सामन्याची सुरुवात मात्र भारतासाठी आशादायक होती. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या अचूक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था 20 धावांत 3 बाद अशी झाली. क्विंटन डी कॉक, एडेन मार्करम आणि रयान रिकेल्टन लवकर परतले. पण त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरत 97 धावांची भागीदारी रचली. ब्रेविसने 29 चेंडूत 45 धावा केल्या, तर मिलरने 35 चेंडूत 63 धावांची तुफानी खेळी करत भारताच्या गोलंदाजांवर दबाव आणला. शेवटी ट्रिस्टन स्टब्सच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 187 धावांचा मजबूत टप्पा गाठला.
188 धावांचे लक्ष्य भारतीय फलंदाजांसाठी डोंगर ठरले. पॉवरप्लेमध्येच 31 धावांत 3 गडी बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला. ईशान किशन शून्यावर बाद झाला, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा लवकर माघारी फिरले. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या फार काळ टिकू शकले नाहीत. शिवम दुबेने 37 चेंडूत 42 धावांची झुंज दिली, पण इतरांकडून साथ न मिळाल्याने भारताचा डाव 111 धावांत संपुष्टात आला.
या पराभवामुळे सुपर-8 गटातील समीकरणे बदलली आहेत. दक्षिण आफ्रिकेने 2 गुणांसह आपले खाते उघडले, तर भारतासाठी पुढील सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 26 फेब्रुवारीला झिम्बाब्बेविरुद्ध चेन्नई येथे आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे होणारे सामने आता ‘करो या मरो’ स्वरूपाचे असतील.






