जळगाव: जागतिक राजकारणातील घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर कसा होतो, याचा अनुभव सध्या भारतीय सराफा बाजारात येत आहे. बुधवारी अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी घोषित होताच सोन्या-चांदीने जी गगनभरारी घेतली होती, ती केवळ 24 तासांतच जमिनीवर आली आहे. जळगावमध्ये सोन्याच्या दरात 2,100 रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 7,000 रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

बुधवारी अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळून शांततेचे संकेत मिळताच बाजारात अनपेक्षित तेजी आली होती. अवघ्या काही तासांत सोन्यात 3,000 आणि चांदीमध्ये 10,000 रुपयांची वाढ झाली. मात्र, ही तेजी कमीवेळ टिकली.
सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा डॉलर वधारतो, तेव्हा सोन्याच्या मागणीवर परिणाम होतो आणि किमती खाली येतात. अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीमुळे युद्धाचे सावट दूर झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून इतर पर्यायांकडे वळवण्यास सुरुवात केली आहे, हेच या घसरणीचे मुख्य कारण आहे.
जीएसटीसह (GST) सोन्याचा भाव 1,53,985 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) इतका आहे. तर, चांदीचा दर 2,47,200 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.







