मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या (Eknath Shinde) तोफा डागल्या जात असतानाच, आमदार रोहित पवार यांनी एका जुन्या प्रकरणाचा ‘बॉम्ब’ टाकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यादरम्यान त्यांचा विमान प्रवास किती थरारक आणि जीवघेणा ठरला होता, याचा खळबळजनक गौप्यस्फोट पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.

रोहित पवारांच्या दाव्यानुसार, जेव्हा एकनाथ शिंदे दावोसला (स्वित्झर्लंड) जात होते, तेव्हा त्यांच्या विमानाचा ‘फ्लाईट प्लॅन’ कमालीचा गोंधळलेला होता. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कोणत्याही देशाच्या हवाई हद्दीतून जाताना पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र, शिंदेंचे विमान जेव्हा इराणच्या हद्दीत शिरले, तेव्हा तिथल्या हवाई नियंत्रण कक्षाने (ATC) थेट इशारा दिला की, “तुमचा फ्लाईट प्लॅन आमच्या रेकॉर्डमध्ये नाही, विमानाचा मार्ग आत्ताच्या आत्ता बदला, अन्यथा आम्ही विमान पाडू!”
इराणच्या इशाऱ्यानंतर वैमानिकाने विमान इराकच्या दिशेने वळवले, पण तिथेही परिस्थिती बदलली नाही. इराकनेही परवानगी नसल्याचे सांगत विमान पाडण्याची धमकी दिली. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार होता. अखेर हे विमान ‘बहरीन’ला उतरवण्यात आले आणि तिथून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील प्रवास झाला.
रोहित पवारांनी या प्रकरणाचे धागेदोरे VSR कंपनीशी जोडले आहेत. “एका उपमुख्यमंत्र्यांचे विमान दोन देश पाडण्याची धमकी देतात, हे सामान्य नाही. हा घातपाताचा प्रयत्न होता का?” असा सवाल करत त्यांनी सत्तेतील नेत्यांच्या सुरक्षेवर बोट ठेवले आहे.




