Crime News: उत्तर प्रदेशातील : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका तरुणाने स्वतःच्या कुटुंबावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्याच्या जुळ्या बहिणीचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना मुरादाबादमधील माझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुद्धि विहार कॉलनीत घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार हार्दिक नावाचा 25 वर्षांचा युवक गुरुग्राम येथे नोकरी करत होता. त्याची इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती आणि दोघांमध्ये प्रेमसंबंधही निर्माण झाले होते. काही महिन्यांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले. या घटनेनंतर हार्दिक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. त्याला आपल्या आई आणि बहिणीमुळे हे नाते तुटले असे वाटत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
होळीच्या निमित्ताने हार्दिक आणि त्याची जुळी बहीण हिमशिखा मुरादाबाद येथे आईकडे आले होते. काही दिवसांनंतर दोघांनी पुन्हा गुरुग्रामला परत जाण्याचे ठरवले होते. मात्र त्याआधीच दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर हार्दिकने स्वयंपाकघरातील सुरी घेऊन बहिणीवर हल्ला केला. त्याने हिमशिखावर 40 पेक्षा अधिक वेळा वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ल्यानंतर हार्दिक आईच्या ऑफिसमध्ये गेला आणि तिला घरी घेऊन आला. घरी आल्यावर आईला मुलगी जखमी अवस्थेत पडलेली दिसली. त्या ओरडू लागल्यावर हार्दिकने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला आणि तेथून पळून गेला. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून घरात धाव घेतली आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी हिमशिखाला मृत घोषित केले, तर आईवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी आरोपी हार्दिकला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







