मुंबई: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे ओझे खांद्यावरून (Career Guidance) उतरले की, विद्यार्थी आणि पालकांसमोर त्यापेक्षाही मोठा प्रश्न उभा ठाकतो, “आता पुढे काय?” इंजिनीअरिंग, मेडिकल की कॉमर्स? की अजून काही वेगळं? अनेकदा केवळ मित्रांचं पाहून किंवा पालकांच्या आग्रहाखातर चुकीची शाखा निवडली जाते आणि नंतर पश्चात्ताप होतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी राज्य शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने (मुंबई) एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून, विद्यार्थ्यांना आता तज्ज्ञांमार्फत मोफत मानसशास्त्रीय चाचण्या आणि समुपदेशन दिले जाणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि कल वेगळा असतो. कोणाला गणितात गती असते, तर कोणाची कल्पनाशक्ती कलेच्या क्षेत्रात चांगली असते. केवळ गुणांच्या आधारे करिअर निवडण्याऐवजी, विद्यार्थ्याच्या उपजत गुणांचा शोध घेण्यासाठीमानसशास्त्रीय चाचण्या आणि समुपदेशन अत्यंत प्रभावी ठरतात. खासगी संस्थांकडे या चाचण्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात, मात्र सरकारने ही सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहे.
नोंदणी कशी कराल?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 14 मार्चपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
-
कुठे संपर्क साधाल: प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालय, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल परिसर, फोर्ट, मुंबई. (सेंट झेवियर कॉलेजजवळ).
-
आवश्यक कागदपत्रे: परीक्षेच्या हॉल तिकिटाची झेरॉक्स, घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक.
मुलांवर स्वतःच्या इच्छा लादण्यापेक्षा, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखणे महत्त्वाचे आहे. या उपक्रमात विविध प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप आणि नवीन अभ्यासक्रमांची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या संधीचा नक्की फायदा घ्या.




