पटना: बिहार पोलीस दलात ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी थेट राजकारणात पाऊल ठेवल्याने अनेकांना धक्का बसला होता. आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सचे अधीक्षक होते. दरम्यान, सध्या ते जमालपूर या विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.

जमालपूरमध्ये जदयूचे नचिकेता मंडल आणि इंडियन इनक्लूझिव्ह पार्टीचे (IIP) नरेंद्र कुमार तांती हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तिघात लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असल्याने यश नक्की कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षात काम करताना ड्रग्ज तस्करांना धडा शिकवला होता. बिहारला आपली कर्मभूमी मानत, मोठ्या जनसमर्थनाच्या जोरावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता बिहारची जनता त्यांची साथ देणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







