पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी (Bihar Election) आलेल्या एका ताज्या (Bihar Opinion Poll) ओपिनियन पोलनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेत परत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएएनएस-मॅट्रिझ (IANS–MATRIZE) या सर्वेक्षण संस्थेच्या अंदाजानुसार, भाजप आणि जेडीयू या दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणात जागा मिळतील. अहवालानुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊन त्यांना 83 ते 87 जागा मिळू शकतात, तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 61 ते 65 जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, एनडीए आघाडीला एकूण 153 ते 164 जागांचा आकडा गाठता येईल, असा अंदाज आहे, तसेच मतांच्या टक्केवारीच्या दृष्टीने एनडीएला 49% मते मिळण्याची शक्यता आहे.

याउलट, राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, त्यांना केवळ 76 ते 87 जागांवर समाधान मानावे लागेल. आरजेडीला 62 ते 66 जागा मिळतील, परंतु काँग्रेसला सर्वात मोठा तोटा होऊन त्यांना केवळ 7 ते 9 जागा मिळतील, असे भाकीत सर्वेक्षणात करण्यात आले आहे. डाव्या पक्षांना (CPI-M-L) 6 ते 8 जागा तर व्हीआयपी पक्षाला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणामुळे एनडीएच्या पुनरागमनाच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे.
या सर्व्हेनुसार, आरजेडीला सर्वाधिक 22% मते तर भाजपला 21% मते मिळण्याची शक्यता आहे, तरीही ‘सीट कन्व्हर्जन’च्या बाबतीत भाजप आघाडीवर राहील. यामागे जेडीयू, एलजेपी आणि मित्रपक्षांचे बरेच मत भाजपच्या खात्यात ट्रान्सफर होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. तसेच, जागावाटपातील चांगला समन्वय आणि संघटनात्मक शिस्त यामुळे एनडीएला वाढती आघाडी मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, काँग्रेसला अधिक जागा दिल्यामुळे आरजेडीला फटका बसला असावा, असा विश्लेषकांचा दावा आहे. काँग्रेसला 62 जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे आणि जर हे अंदाज खरे ठरले, तर आरजेडीने उत्तर प्रदेशमधील 2017 च्या समाजवादी पक्षाच्या आघाडीसारखीच चूक केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे, जिथे काँग्रेसला जास्त जागा देऊनही अपेक्षित यश मिळाले नव्हते.







