आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अर्जातील तफावतीमुळे निर्माण झालेल्या वादानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) परीक्षार्थ्यांची ओळख पडताळणी अधिक पारदर्शक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे यूपीएससी परीक्षांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे ठरणार आहे. यासाठी आयोगाने नवीन सुधारित परीक्षा पोर्टल सुरू केले आहे.

२८ मे रोजी सुरू झालेल्या या पोर्टलवर आतापर्यंत २.६५ लाख नवीन खाती तयार करण्यात आली असून, त्यापैकी १.१३ लाखांनी सार्वत्रिक नोंदणी पूर्ण केली आहे. यामध्ये १.०५ लाख उमेदवारांनी आधार प्रमाणीकरण स्वीकारले आहे. सुमारे ६० हजार उमेदवारांनी अर्ज सादर केला असून ५५ हजार अर्ज प्रक्रियेत आहेत. आठवड्याभरात ९२% उमेदवारांनी आधारचा वापर करून आपली ओळख सिद्ध केली आहे. या नवीन पोर्टलवर चार टप्प्यात नोंदणी प्रक्रिया होणार आहे – खाते तयार करणे, सार्वत्रिक नोंदणी, अर्ज भरणे आणि परीक्षा अर्ज सादर करणे. एकदा भरलेली माहिती पुन्हा विविध परीक्षांसाठी वापरता येईल, असे यूपीएससीचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी सांगितले.
आधार प्रमाणीकरण हे ऐच्छिक असले तरी आयोग उमेदवारांना त्यासाठी प्रोत्साहित करत आहे. अन्य ओळखपत्र वापरणाऱ्यांना पडताळणीत विलंब होण्याची शक्यता आहे. नवीन पोर्टलमध्ये नागरी सेवा, संयुक्त संरक्षण सेवा, एनडीए यासह १४ प्रमुख परीक्षांचा समावेश आहे. पूजा खेडकर प्रकरणात अर्जातील अपंगत्व, नाव व पालकांच्या माहितीतील विसंगतीमुळे तिची उमेदवारी रद्द झाली होती. तिला सेवेतून काढण्यात आले असून, तिने न्यायालयात याविरोधात आव्हान दिले आहे. आयोगाच्या या नव्या पावलाने परीक्षेतील पारदर्शकता अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.







