Bangladesh News: ढाका: बांगलादेशातील मयमनसिंग येथे मारहाण करून ठार मारण्यात आलेल्या हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांनी धार्मिक भावना दुखावणारी कोणतीही अपमानजनक टिप्पणी केली होती, याचा कोणताही थेट पुरावा आढळलेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा- Crime News: नवरी वाट पाहत राहिली अन् नवरदेवाचा शेतात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दीपू चंद्र दास हे मयमनसिंगमधील एका कापड कारखान्यात काम करत होते. 18 डिसेंबरच्या रात्री एका मुस्लिम सहकाऱ्याने धार्मिक निंदेचा आरोप केल्यानंतर जमाव जमला आणि दास यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्लामचा अपमान केल्याचा आरोप करत जमावाने त्यांचा मृतदेह झाडाला लटकवून जाळल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मयमनसिंगमधील रॅपिड अॅक्शन बटालियन 14 चे कंपनी कमांडर मोहम्मद समसुझ्झमान यांनी बांगलादेशी वृत्तपत्र द डेली स्टारला सांगितले की, प्राथमिक तपासात मृत व्यक्तीने फेसबुक किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केली असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. तसेच दास यांनी प्रत्यक्षात असे काही बोलल्याचे ऐकले किंवा पाहिले असल्याचा दावा करणारा कोणीही समोर आलेला नाही.
समसुझ्झमान यांनी असेही सांगितले की, परिस्थिती बिघडू लागल्यानंतर कारखान्याचे रक्षण करण्यासाठी दास यांना जबरदस्तीने कारखान्याबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला 2 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मयमनसिंगचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मोहम्मद अब्दुल्ला अल मामून यांनी दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





