पुणे, ता. 22: लोहगाव (पुणे) येथील श्री संत तुकाराम महाराजांची 2 एकर जमीन लँड माफियांनी विकल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक ‘पुणे प्राईम न्यूज’ने उघडकीस आणला असून याचे सबळ पुरावे हाती लागले आहेत. तुम्हाला वाटत असेल ही जमीन दुसरी तिसरी कोणी विकली असेल परंतु, ही जमीन चक्क देखभाल करणाऱ्या पंच कमिटीने कोट्यावधी रुपयांच्या मलिद्यासाठी विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे श्री संत तुकाराम महाराजांच्याच जमिनीवर (Sant Tukaram Maharaj Trust Land Scam) डल्ला मारल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या नावावर लोहगाव (पुणे) येथील सर्व्हे नंबर 88 मध्ये 1 हेक्टर 25 आर जमीन आहे. या जमीनीच्या देखभालीची जबाबदारी वहिवाटदार पडाळीवरील पंच कमिटी यांच्यावर आहे. या पंच कमिटीतील काही महाभागांनी कोट्यावधी रुपयांच्या मोहमायेपोटी चक्क महाराजांच्या जमिनीवर डल्ला मारला आहे. महाराजांच्या 1 हेक्टर 25 आर क्षेत्र जमिनीपैकी 80 आर ही जमीन 3 कोटी 25 लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
श्री संत तुकाराम महाराजांची जमीन वहिवाटदार पडाळीवरील पंच अंजना निवृत्ती कुटे, एकनाथ दगडू खांदवे, चंद्रकांत आबाजी खांदवे, दिपक दत्तात्रय खांदवे, धनश्री अंकुश पर्हाड, नवनाथ अंकुश खांदवे, पुष्पा भगवान खांदवे, पुष्पा भिकाजी पवार, प्रकाश भगवान खांदवे, प्रदिप भगवान खांदवे, प्रमिला बबन खांदवे, प्रमोद कृष्णा खांदवे, प्रविण कृष्णा खांदवे, बायडाबाई सुदाम कुन्हे, बाळु बबन खांदवे, मधुकर दत्तात्रय खांदवे, यमुना दत्तात्रय खांदवे, रखमाबाई बबन मोरे, राजश्री तुषार थोपटे, राहुल आबाजी खांदवे, वनमाला आबूराव खांदवे, विजय विष्णू खांदवे, शिवाजी सुदाम खांदवे, संगीता रमेश खांदवे, सुनिता आनंद सस्ते, सुरेश विष्णू खांदवे यांनी अनधिकृतपणे जमिनीची विक्री चेतन रमेश धुमाळ, प्रविण प्रकाश शिंदे, बापु आनंता जाधव यांना केली आहे.
विशेष बाब म्हणजे, या व्यवहाराला रघुनाथ दशरथ सातव, जयश्री जगन्नाथ सातव, एकनाथ दशरथ सातव
अमित जगन्नाथ सातव, गऊबाई मारुती नागवडे, बबनराव किसन कांचन, सुनिल बबन खांदवे, दत्तात्रय बबन खांदवे, सिद्धेश्वर अशोक काकडे तर्फे क.ज. करिता कु.मु. धारक चेतन रमेश धुमाळ गोपीनाथ बबन खांदवे, सागर अशोक काकडे, दत्तात्रय मुरलीधर हरपळे, मल्हारी सदाशिव कामठे या सर्वांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान, कोंढवा बुद्रुक येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 12 मध्ये या जमिनीचा खरेदी दस्त करण्यात आला आहे. त्याचा खरेदीखत दस्त क्रमांक 27097 हा 18 नोव्हेंबर 2025 अन्वये नोंदवला आहे. या दस्त नोंदणीसाठी कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता सहाय्यक दुय्यम निबंधकाने आर्थिक हितसंबंधापोटी, नियमांची पायमल्ली करत ही करामत करून दाखवली आहे. त्यामुळे नोंदणी व मृद्रांक शुल्क विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तसेच महसूल विभागाने संबंधित सर्वे नंबर भोगवटादार वर्ग एक मध्ये ठेवल्याने हा विक्री व्यवहार झाला आहे.
पुण्यात एकापाठोपाठ जमीन घोटाळे उघडकीस
पुणे हे शिक्षण, माहिती व तंत्रज्ञानाचे माहेरघर समजले जाते. मात्र जमीन घोटाळ्यामुळे पुण्याची वेगळीच ओळख बनू लागली आहे. पुण्यात एका पाठोपाठ जमिनीचे अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमीन विक्रीचा घोटाळा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीचा मुंढवा येथील जमीन घोटाळा, मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील जलसंपदा विभागाच्या जमिनीचा घोटाळा तसेच ताथवडे येथील 15 एकर शासकीय जमिनीचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यातच आता श्री संत तुकाराम महाराजांच्या जमिनीचा घोटाळा उघडकीस आल्याने पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
“लोहगाव येथील संबंधित जमिनीची कागदपत्रे व दस्त दोन दिवसात मागवून घेतो. पडताळणी केल्यानंतर यामध्ये जर कोणी दोषी आढळले तर संबंधितावर प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करणार आहे.”
– संतोष हिंगाणे (सहाय्यक जिल्हा निबंधक पुणे)
“संत तुकाराम महाराजांचा फेरफार सोडून खाली नावे असणाऱ्या लोकांचे खरेदीखत केले आहे. अविभाज्य हिस्स्याचा दस्त नोंदविला आहे. तसेच हा दस्त कायदेशीर आहे की नाही याची तपासणी करावी लागेल.”
– गजेंद्र काष्टेवाड (सह दुय्यम निबंधक- कोंढवा बुद्रुक 12, हवेली )
“संत तुकाराम महाराजांच्या नावावर असलेली जमीन विक्री करता येत नाही. या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिरांची डागडुजी व जीर्णोधार केला जातो. या गंभीर प्रकरणाची माहिती घेतो. आणि हे जर चुकीचे काम झाले असेल तर त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करतो.”
– माणिक महाराज मोरे (संत तुकाराम महाराजांचे वंशज व माजी विश्वस्त जगतगुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू, ता. हवेली)






