Accident News : उत्तराखंडमध्ये दि.२४ नोव्हेंबर सोमवार रोजी एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. गुजरात राज्याहून कुंजापुरी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांनी खचाखच भरलेली एक बस खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर ते कुंजापुरी मंदिर मार्गावर हिंडोलाखालजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस सुमारे ७० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी गुजरातमधील होते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि एसडीआरएफ (SDRF) पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले आणि दरीत कोसळलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
जखमी झालेल्या २३ प्रवाशांपैकी अनेकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने, प्रशासनाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. कुंजापुरी दर्शनासाठी निघालेल्या गुजरातच्या भाविकांवर आलेल्या या अचानक संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.







