मध्य प्रदेश: सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणं किंवा मैत्री करणं आजकाल सामान्य असलं तरी, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एका तरुणाला इन्स्टाग्रामवर एका महिलेला ‘हाय’ मेसेज करणं चांगलंच महागात पडलं आहे. या मेसेजमुळे संतापलेल्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी तरुणाला इतकी मारहाण केली की, त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. हा धक्कादायक प्रकार खंडवा येथील मोघाट रोड पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदपूर खैगाव गावात घडला.

नेमकी घटना काय ?
या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिनेश पाल असे आहे. दिनेश पाल सुट्टीच्या दिवशी घरी असताना मोबाईल पाहत होता. त्याने शेजारच्या एका महिलेला इन्स्टाग्रामवर फॉलो केले. त्या महिलेने दिनेशला ‘फॉलोबॅक’ केल्यानंतर दिनेशने तिला केवळ ‘Hii’ असा मेसेज पाठवला. मेसेज पाठवल्यानंतर दिनेश शेतात कामासाठी गेला. थोड्याच वेळात, त्या महिलेचे पती आणि त्यांचे काही साथीदार शेतावर पोहोचले. त्यांनी दिनेशचे काहीही न ऐकता त्याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी दिनेशवर काठ्या आणि रॉड यांचा वापर करून हल्ला केला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला 7 टाके पडले असून त्याचे हात आणि पाय देखील फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दिनेशला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल
या प्रकरणात केवळ दिनेशनेच नाही, तर दुसऱ्या पक्षानेही तक्रार दाखल केली आहे. आरोपी सूरज याने जखमी दिनेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दिनेशने आपल्या पत्नीला इन्स्टाग्रामवर ‘हाय’ मेसेज पाठवून तिला त्रास देत असल्याचा आरोप तक्रारीत केला सूरजने केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारींची नोंद घेतली असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.







