मुंबई: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक काही काळासाठी उत्तरकाशीमध्ये अडकले होते.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील 11 व इतर जिल्ह्यांतील 40, असे एकूण 51 पर्यटकांचा समावेश असून, सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मदतकार्य आणि समन्वय
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना मदत व सहाय्य मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राशी सातत्याने संपर्क केला जात आहे. महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्यामार्फत अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील संबंधित जिल्हा प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले की, घटनेवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार आहेत.
महत्वाचे संपर्क क्रमांक:
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
93215 87143
022-2202 7990
022-2279 4229
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड
0135-2710334
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांतून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.







