Thane Crime : डोंबिवली : डोंबिवली परिसरातील एका कुख्यात गुन्हेगारावर ठाणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय 55) याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर दावडी येथील पाटील यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. पोलिसांनी घराची तपासणी करत असताना एका शू-रॅकमध्ये संशयास्पद कप्पा आढळला. त्या कप्प्याची तपासणी केली असता त्यामध्ये शस्त्रास्त्रांचा मोठा साठा लपवून ठेवलेला असल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 167 एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या साठ्याची अंदाजे किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जप्त केलेल्या बंदुकांमध्ये 5 देशी बनावटीची पिस्तुले आणि रिव्हॉल्व्हर, तसेच 2 एअर गनचा समावेश आहे. काही शस्त्रांवर परदेशी चिन्हे असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात काडतुसे सापडल्यामुळे हा साठा केवळ दाखवण्यासाठी नसून वापरासाठी ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गंभीरपणे सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, सुरेंद्र पाटील हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो सतत गुंडगिरी दर्शवणारे व्हिडिओ पोस्ट करत असल्याचे समोर आले आहे. अटकेनंतर त्याने हा साठा केवळ व्हिडिओसाठी असल्याचा दावा केला असला तरी पोलिसांनी त्यावर विश्वास व्यक्त केलेला नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हा शस्त्रसाठा इतर गुन्हेगारी कामांसाठी वापरला जात होता का, याचा शोध घेतला जात आहे.







