मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या पर्वाची चर्चा सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या सत्तेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. केवळ पदभार स्वीकारून त्या थांबल्या नाहीत, तर आपल्या पतीच्याच आक्रमक कार्यपद्धतीचा वारसा पुढे चालवताना दिसत आहेत. मंत्रालयातील नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत त्यांनी कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दोन दिवसांपूर्वी लाचखोरीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला होता. झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र ढेरंग याला एका मेडिकल दुकानदाराकडून 35 हजार रुपयांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, झिरवाळ यांच्या खाजगी सचिवाने (PA) लाच घेण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती तपासात समोर आली. या एका घटनेमुळे संपूर्ण प्रशासन आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली.
सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्याकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. “स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा जपा. तुमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळे सरकारची बदनामी होता कामा नये,” अशा कडक शब्दांत त्यांनी झिरवाळ यांना सुनावले.







