Crime News: इंदौर : इंदौर येथील द्वारकापुरी भागात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने देशभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पियुष धामनोतिया याला पोलिसांनी मुंबई येथून अटक (Arrest) केली असून सध्या त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेच्या तपासात समोर येत असलेली माहिती अत्यंत गंभीर असून पोलिसांसह सर्वांनाच हादरवणारी आहे.

मृत तरुणी ही एमबीएचे शिक्षण घेत होती. 10 फेब्रुवारी रोजी आरोपी तिच्यासोबत तिच्या घरी गेला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे घरात जाताना दिसतात, मात्र काही वेळानंतर आरोपी एकटाच बॅग घेऊन बाहेर पडताना दिसतो. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीकडे शारीरिक संबंधांची मागणी केली होती. तिने नकार दिल्यावर त्याने तिचे हात बांधले आणि डोळे झाकून गिफ्ट देण्याचे नाटक केले. तिने विरोध केल्यावर त्याने तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने वार करून तिची हत्या केली.
मृतदेहाबरोबर नको ते केलं
हत्या केल्यानंतर आरोपी तिथून लगेच पळून गेला नाही. तो बाहेर गेला, दारू घेऊन आला आणि मृतदेहाजवळ बसून मद्यपान केले. चौकशीत आरोपीने मृतदेहाशी गैरवर्तन केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर तो पनवेलमार्गे मुंबईकडे गेला. तेथे हॉटेलमध्ये थांबून त्याने तरुणीचा मोबाइल फोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने पनवेल परिसरात निर्जन ठिकाणी अगरबत्ती लावून आणि युट्यूब वरचे व्हिडिओ पाहून अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याचा दावा आहे की त्याला मृत तरुणीच्या आत्म्याशी बोलून माफी मागायची होती.
याशिवाय आरोपीने तिची बदनामी करण्यासाठी काही खासगी व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपमध्ये शेअर केल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांच्या मते, हा गुन्हा नियोजनपूर्वक करण्यात आला असून आरोपी मानसिक आजाराचे नाटक करत असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.







