मुंबई: डोंबिवलीतून (Dombivali Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवलीजवळच्या आयरे या गावात घडली आहे. इकबाल नन्हेबक्ष अन्सारी (37 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना मंगळवारी (15 ऑक्टोबर) सकाळी घडली. आरोपी इकबाल घरातच राहत होता.पालक बाहेर गेले असता 16 वर्षाची मुलगी घरातील भांडी घासत होती. त्यावेळी इकबालचं मन फिरलं आणि त्याने घराची कडी लावली. त्यानंतर त्याने मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केले. मुलीने इकबालला विरोध करून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र इकबालने तिला पकडले अन् विनयभंग केला.

दरम्यान, आई आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आई आणि वडिलांना सांगितला. त्यानंतर रामनगर पोलिसांत धाव घेत इकबालच्या विरोधात गुन्हा नोंदवला. रामनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या घटनेचा आणखी तपास करण्यात येत आहे.








