मुंबई: राज्यातील राजकारणात (Municipal Corporation Election) आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. आता सर्वांचे लक्ष २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे लागले आहे. विशेष म्हणजे, आज मंगळवार 23 डिसेंबरपासून या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत आपले अर्ज भरता येतील. यावेळी निवडणूक आयोगाने एक मोठा दिलासा दिला असून, तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने जमा करण्याची मुभा दिली आहे.

निवडणूक कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार, ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २ जानेवारी २०२६ रोजी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर ३ जानेवारीला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. या २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार असून १६ जानेवारीला या निवडणुकांचे निकाल स्पष्ट होतील. सध्या तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दुसरीकडे, प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी, महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील जागांचा प्रश्न अद्याप चर्चेतच आहे. सत्तेची ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराचा खरा धुरळा उडणार आहे.







