मुंबई: जगभरात सध्या ‘व्हॅलेंटाईन वीक’ साजरा होत असताना, मुंबईच्या मुलुंड (Mulund News) परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून एका 21 वर्षीय तरुणाने भरवस्तीत आपल्या माजी प्रेयसीचा पाठलाग केला आणि रेल्वे स्थानक परिसरात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

पुरव मनोहर गोरे असे तरुणाचे नाव आहे. 2024 मध्ये ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, पुरवच्या संशयी स्वभावामुळे आणि सततच्या वादांमुळे तरुणीने डिसेंबर 2025 मध्ये सर्व संबंध तोडले होते. मात्र, नातं संपल्यानंतरही पुरव तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता.
तरुणी कामावर जात असताना पुरव तिच्या दुकानाबाहेर दबा धरून बसला होता. त्याने तिला जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच त्याने तिला मुलुंड रेल्वे स्थानकाकडे नेले. ती दुसऱ्या तरुणाशी बोलते का ते तपासण्यासाठी तिचा मोबाईल हिसकावून तपासला. जेव्हा तरुणीने विरोध केला, तेव्हा त्याने पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतले. “जर तू माझ्याशी नातं ठेवलं नाहीस, तर मी तुला आणि स्वतःला संपवेन,” अशी धमकी दिली. तरुणी ओरडल्यानंतर तरुणाने घाबरून पळ काढला, दरम्यान, याप्रकरणी तरुणीने गुन्हा दाखल केला आहे.







