मुंबई: मुंबईतील आझाद मैदानावर सुरू (Manoj Jarange Patil) असलेल्या धनगर आरक्षण (Dhanagar Reservation) आंदोलनाला आता वेगळीच धार मिळताना दिसत आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेल्या आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत धनगर समाजाला थेट संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. (Latest Marathi News)

आंदोलनाचा नववा दिवस सुरू असताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “घरी बसून आरक्षण मिळणार नाही. मिळेल त्या साधनाने मुंबईत या, रस्त्यावर उतरा. तुम्ही ताकदीने लढलात तर सहा कोटी मराठा समाज तुमच्या मागे उभा करतो.” त्यांच्या या विधानामुळे आंदोलनाला नवे राजकीय आणि सामाजिक वजन मिळाल्याचे मानले जात आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, ही मुख्य मागणी असून, त्यासाठी वेळोवेळी आंदोलनं झाली आहेत. मात्र ठोस निर्णय न झाल्याने समाजात नाराजी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील उपोषणाला आता व्यापक स्वरूप येण्याची चिन्हे आहेत.
जरांगे पाटील यांनी धनगर समाजातील नेत्यांनाही स्पष्ट संदेश दिला. “मान-अपमान बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र या. नेतृत्वाच्या वादात वेळ घालवू नका, समाजाच्या हक्कासाठी लढा,” असे त्यांनी आवाहन केले. तसेच समाजानेही आपल्या नेत्यांचा सन्मान राखत एकजूट दाखवावी, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, मराठा आणि धनगर या दोन मोठ्या समाजांमध्ये आंदोलनाच्या पातळीवर निर्माण होणारी एकजूट ही राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. जरांगे पाटील यांनी “मी नेता नाही, मी आंदोलक आहे,” असे म्हणत नेतृत्व धनगर समाजानेच घ्यावे, असे स्पष्ट केले.
या भेटीनंतर आझाद मैदानावरील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सरकार या वाढत्या दबावाला कसे प्रतिसाद देते आणि धनगर आरक्षणाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







