Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Elections) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील तारखा राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती मिळून एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. (Nagarpalika Election)

या निवडणुकीसाठी आज, 4 नोव्हेंबरपासून तातडीने आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) द्वारे घेतली जाणार आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
टप्पा तारीख
नामनिर्देशन पत्र (अर्ज) भरण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर
अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर
अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर
मतदान 2 डिसेंबर
निकाल 3 डिसेंबर
महत्वाचे मुद्दे आणि तयारी
राज्यातील या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार आपला हक्क बजावतील. यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार आहेत.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने 32 विशेष प्रचार मोहिमा तयार केल्या आहेत. दिव्यांग, तान्ह्या बाळासह स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी पहिले प्राधान्य दिले जाईल. तसेच, काही गुलाबी मतदान केंद्रे येथे सर्व अधिकारी महिला असतील. यांची स्थापन करण्यात येणार आहे.
खर्च मर्यादा वाढवली
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाख तर नगरसेवक पदासाठी 7 लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
संभाव्य दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या नावापुढे ‘डबल स्टार’ चिन्ह दाखवण्यात आले असून, अशा मतदारांकडून दुसरीकडे मतदान करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.
विभागनिहाय निवडणुका
राज्यातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी विभागनिहाय निवडणूक पुढीलप्रमाणे असेल:
विभाग नगरपरिषद/नगरपंचायती संख्या
पुणे 60
नागपूर 55
संभाजीनगर 52
नाशिक 49
अमरावती 45
कोकण 17
राज्यातील एकूण 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समिती आणि 246 नगरपालिकांची मुदत संपलेली आहे. जाहीर झालेला हा कार्यक्रम पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आहे.







