Crime News: मुंबई : भांडुप परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन अल्पवयीन शाळकरी मुलांनी त्यांच्या 14 वर्षांच्या वर्गमित्राची मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावा लपवण्यासाठी मृतदेह (Deathbody) विहार तलाव येथे फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. भांडुप पोलीस ठाणे यांनी 14 आणि 15 वर्षांच्या तीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Bhandup Murder Case)

मृत मुलाचे नाव सिद्धार्थ अजय लोंढे (वय 14) असे आहे. तो भांडुप पश्चिम येथील तुळशेटपाडा भागात कुटुंबासोबत राहत होता. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर खेळायला जात असल्याचे सांगून निघाला, मात्र रात्रीपर्यंत परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर आईने पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
मृतदेह आढळल्याने खळबळ
दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विहार तलावात एक मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आला. प्राथमिक अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले.
तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच परिसरातील एका मित्रासोबत पाहिल्याचे समोर आले. चौकशीत त्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि आणखी दोन मित्रांचा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली लाकडी काठी जप्त केली आहे. रागातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही मुलांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
