Crime News: मुंबई : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील तसेच शाळेतील शिक्षकांचे पैसे चोरी करत असल्याच्या संशयावरून एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलांना अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गोरेगावमधील गोवेले गवळआळी परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी घडली. आरोपीला आपल्या दोन लहान मुलांवर घरातील पैसे चोरी केल्याचा संशय होता. तसेच शाळेतील शिक्षकांकडूनही मुलांनी पैसे चोरल्याच्या तक्रारी आल्यामुळे आरोपी संतप्त झाला. या रागाच्या भरात त्याने घरातील सुरी गरम करून मुलांच्या हातांवर आणि पायांवर चटके दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
जखमी झालेले दोन्ही मुले ही आरोपीची स्वतःचीच मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अमानुष प्रकारामुळे मुलांना गंभीर वेदना सहन कराव्या लागल्या. काही दिवसांनी या प्रकाराची माहिती बाहेर आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला.
सध्या जखमी मुलांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून बालहक्क आणि बालसंरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.







