Crime News: बदलापूर: बदलापूरमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्वेकडील यादवनगर परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत थोरात आणि त्यांची पत्नी अश्विनी थोरात यांच्यात काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. या दांपत्याला 17 वर्षांची मुलगी आहे. ती रात्री घराबाहेर का जाते, यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. याच कारणावरून मंगळवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला.
वाद इतका वाढला की, रागाच्या भरात चंद्रकांत यांनी कमरेचा पट्टा वापरून पत्नीचा गळा आवळला. या घटनेत अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी मुलगी घरात झोपलेली असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी चंद्रकांत थोरात याला अटक करण्यात आली आहे. त्याला अंबरनाथ न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मुलीच्या वागणुकीवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. मंगळवारी रात्री झालेल्या वादातूनच ही घटना घडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







