Crime News: ठाणे: दिवसेंदिवस आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नोकरी, गुंतवणूक, कर्ज किंवा जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घातला जात आहे. अनेक वेळा बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने आणि ओळखीचा गैरवापर करून लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जाते, अशातच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जेएनपीटीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका 34 वर्षीय व्यक्तीची 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

जॉबचे आमिष दाखवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण येथील रहिवासी ऋषभ राजेश म्हात्रे याने उलवे येथे राहणाऱ्या तक्रारदाराला जेएनपीटीमध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून विश्वासात घेतले. आरोपीने तक्रारदाराला निर्यात सहाय्यक व्यवस्थापक या पदाची ऑफर असल्याचे भासवले. नोकरीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असे सांगत त्याने भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे तयार करून तक्रारदाराला दाखवली.
हप्त्यांमध्ये पैसे घेतले
मार्च 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत ही फसवणूक झाली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या काळात आरोपीने विविध कारणे सांगत तक्रारदाराकडून हप्त्यांमध्ये पैसे उकळले. कधी फाइल प्रक्रिया, कधी मंजुरी शुल्क, तर कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदाराकडून एकूण 32 लाख रुपये घेतले.
फसवणूक झाल्याचा संशय
बराच काळ लोटूनही नोकरी मिळत नसल्याने तक्रारदाराला संशय येऊ लागला. त्याने आरोपीकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर जेएनपीटी कार्यालयात थेट माहिती घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
तक्रारीच्या आधारे वाशी पोलिसांनी ऋषभ राजेश म्हात्रे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 318(4) फसवणूक आणि 336(3) बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






