मुंबई: मुंबईच्या भांडुप (Bus Accident) पश्चिम भागात सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो परिसरात रात्री 9:30 वाजता हा अपघात झाला. बेस्टची 606 क्रमांकाची एक इलेक्ट्रिक बस अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने ही घटना घडली. कामावरून परतणाऱ्या प्रवाशांची आणि भाजी विक्रेत्यांची तिथे मोठी गर्दी होती. या अनियंत्रित बसने तिथे असलेल्या 13 जणांना धडक दिली. यामध्ये 4 लोकांचा चिरडून मृत्यू झाला आहे. याशिवाय 9 लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार बसने वळण घेताना अचानक वेग घेतला आणि ती थेट लोकांच्या गर्दीत शिरली. या धडकेचा वेग इतका जास्त होता की, रस्त्यावरील विजेचा लोखंडी खांबही वाकला आहे. जखमी झालेल्या 8 पुरुषांना आणि 1 महिलेला तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला आपल्या ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधिकारी हेमराज राजपूत यांनी सांगितले की, चालक दारू पिलेला नव्हता. हा अपघात बसमधील तांत्रिक बिघाडामुळे झाला की, चालकाच्या चुकीमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या भीषण घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.







