मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरचा रुग्णालयाच्या वसतिगृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. या घटनेमुळे रुग्णालयात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास शिवचरण पाटील हे रुग्णालयातील कामावर उपस्थित नसल्याचे लक्षात आले. ते रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात राहत होते. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्याला ते खोलीत आहेत का, हे पाहण्यासाठी पाठवण्यात आले. सहकारी खोलीत पोहोचला, तेव्हा शिवचरण दिसले नाहीत. त्यांना फोन केला असता मोबाइलचा आवाज बाथरूममधून ऐकू आला. त्यामुळे संशय निर्माण झाला आणि इतरांना याची माहिती देण्यात आली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन बाथरूमचा दरवाजा उघडला असता शिवचरण पाटील मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी काही औषधांच्या बाटल्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, औषधांच्या अतिमात्रेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. शिवचरण यांच्या निधनामुळे एक होतकरू भावी शल्यचिकित्सक गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करतील, तसेच रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशीही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अधिकृत अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.






