मुंबई: नवी मुंबईतील रबाळे परिसरात सोशल मीडियाच्या (Mumbai News) माध्यमातून झालेल्या मानसिक छळामुळे एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या मामाकडून वारंवार अश्लील व्हिडीओ पाठवून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (Latest Marathi News)

विनोद तुपसौंदर (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो रबाळे येथील साईनगर परिसरात राहत होता. जून महिन्यात विनोदचे लग्न नाशिक येथील वैष्णवी नाटकर (वय 25) हिच्याशी झाले होते. लग्नानंतर काही काळ दोघे एकत्र राहत होते. मात्र अलीकडे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही तिच्या मामा संतोष ढगे याच्याशी मोबाईलवरून सतत कॉल आणि चॅटिंग करत होती. ही बाब विनोदच्या लक्षात आल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले. या वादानंतर वैष्णवी माहेरी निघून गेली. त्यानंतर त्याच दिवशी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आल्याचा प्रकार घडला. हे व्हिडीओ संतोष ढगे यानेच पाठवल्याचा संशय विनोदच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे विनोद मानसिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली होता. सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून 25 सप्टेंबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नी आणि तिच्या मामाकडून होत असलेल्या मानसिक छळामुळेच विनोदने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







