मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ‘ही’ फळं ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई: पौष्टिक आणि संतुलित आहारात फळांचा समावेश अत्यंत आवश्यक मानला जातो. अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्सने परिपूर्ण ही फळं प्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला आवश्यक पोषणही देतात. मात्र, काही फळांमधील नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, विशेषतः डायबेटीजग्रस्त रुग्णांसाठी ही फळं धोकादायक ठरू शकतात.
आहारतज्ज्ञांच्या मते, फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) पाहूनच त्यांचा आहारात समावेश करावा. ग्लायसेमिक इंडेक्स हे त्या पदार्थातील कार्बोहायड्रेट्स शरीरात किती वेगाने साखर निर्माण करतात, यावर आधारित असतो. GI 55 पेक्षा कमी असलेले पदार्थ आरोग्यास हितकारक मानले जातात.
या’ फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त:
अंजीर
अंजीर हे शरीरासाठी फायदेशीर फळ मानले जात असले, तरी त्यात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. म्हणून डायबेटीज असलेल्या रुग्णांनी अंजीर टाळावा, असा सल्ला दिला जातो.
द्राक्षं
‘व्हिटॅमिन सी’चा भरपूर स्रोत असलेल्या द्राक्षांमध्ये एका कपामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णांनी द्राक्षांचं सेवन मर्यादित ठेवावं.
आंबा
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्यातही साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. एका मध्यम आकाराच्या आंब्यात जवळपास 46 ग्रॅम साखर असते.
डायबेटीज असलेल्यांनी आंब्याचे सेवन टाळावे, तर लठ्ठ व्यक्तींनीही मर्यादित प्रमाणात खावे.
काय करावे?
1) डायबेटीज असलेल्यांनी फळं खाण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
2) नैसर्गिक साखर असूनही काही फळं रक्तशर्करा झपाट्याने वाढवू शकतात, हे लक्षात घ्यावे.
3) ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेली फळं (जसे की सफरचंद, बेरी, पेरू) प्राधान्याने खावी.
फळं ही आरोग्यासाठी अनमोल देणगी असली, तरी प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार योग्य फळांची निवड आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह आणि लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही फळ अधिक प्रमाणात सेवन करू नये.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात येत आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ यातुन कोणताही दावा करीत नाही.)







