पुणे : नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी गोदावरी नदीत कार पाडून आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.परंतु, आता या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. नदीत कार घालण्यापूर्वीच या निर्दयी पित्याने आपल्या दोन्ही निष्पाप मुलांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती, अशी धक्कादायक माहिती शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवालातून उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले 42 वर्षीय शिक्षक सुनील मोरे यांनी 16 जुलै रोजी सकाळी हे भयानक पाऊल उचलले. त्यांनी नांदेड-मूदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून आपली भरधाव कार थेट गोदावरी नदीत पाडली. या कारमध्ये त्यांची 14 वर्षांची मुलगी सारा आणि 10 वर्षांचा मुलगा सुमेध हे दोघेही होते. सुरुवातीला हा घातपात किंवा एकत्रित आत्महत्या असल्याचा अंदाज होता.

मात्र, डॉक्टरांच्या अहवालानुसार, मोरे यांनी आधी चाकूने सारा आणि सुमेध यांच्या छातीवर व पोटावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून ती नदीत लोटली. याप्रकरणी आता पोलिसांनी मृत सुनील मोरे यांच्याविरोधातच खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले होते आणि मित्रांच्या ग्रुपवर मेसेजही पाठवला होता. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण मुलांसह आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख त्यांनी त्यात केला होता. यात गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या नावांचा समावेश होता.
या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी या चारही जणांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.







