Solapur : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच गावात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला होता. कारण विशेषच होतं—नगरपंचायतीच्या सर्व 17 जागा यंदा बिनविरोध निवडून आल्या आहेत. नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनेलने सर्व जागा बिनविरोध निवडूण आणण्याची किमया केली. अनगर नगरपंचायतीत १७ सदस्यांच्या जागा आहेत. नेमके १७ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीला कुठलाच मुकाबला राहिला नाही. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली. अशी सर्व जागा बिनविरोध होणारी अनगर नगरपंचायत ही राज्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली आहे. Solapur

नगराध्यक्षपदावर मात्र सामना
नगरसेवक बिनविरोध निवडले गेले असले तरी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून राजन पाटील यांच्या सुने प्राजक्ता पाटील मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून उज्ज्वला थिटे उमेदवार आहेत. म्हणूनच नगराध्यक्षपदावर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
राजन पाटलांचे अनगरमधील वर्चस्व
मोहोळ तालुका आणि अनगर परिसरात राजन पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व अनेक वर्षांपासून कायम आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असली, तरी विरोधकांना उभं राहणंही कठीण जातं अशी परिस्थिती इथे वर्षानुवर्षे दिसत आहे. यावेळीही सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून येण्यात पाटील यांचं प्रबळ राजकीय प्रभाव दिसून आला.
“राजन पाटलांची दहशत आहे”
नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांच्या मते— त्यांना अर्ज भरू दिला जात नव्हता,रस्त्यात ट्रॅक्टर लावून अडथळा केला, गाड्यांची तपासणी करून त्यांच्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न झाला. असे आरोप त्यांनी केले. त्यांच्या मते “अनगरमध्ये राजन पाटलांची इतकी दहशत आहे की लोक उभं राहायलाही तयार होत नाहीत.”







