Siddheshwar Express Theft Case: पुणे, ता. 10 : मुंबई व सोलापूर यादरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून (Siddheshwar Express )एका व्यापाऱ्याची तब्बल 5 कोटी 53 लाख रुपये किंमतीची सोने व हिऱ्याचे दागिने असलेली बॅग चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण येथे 6 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री घडली आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा- पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंची लूट! बारामती MIDC परिसरामध्ये थरार; दोन जणांना अटक
अभय कुमार जैन (वय 60, रा. गोरेगाव मुंबई) असे नुकसान झालेल्या सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैन हे सोलापूरहून आपल्या मुलीसह एसी कोच ए-1 मधून मुंबईला परतत होते. व्यवसायाच्या कामासाठी आणलेले सुमारे 4 किलो 456 ग्रॅम वजनाचे मौल्यवान दागिने त्यांनी एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवले होते. सुरक्षेसाठी ही बॅग त्यांनी सीटखाली चेनने लॉक केली होती.
जैन हे रात्री गाडीत झोपले. सिद्धेश्वर एक्स्प्रेस कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना पहाटे जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती. जैन यांनी तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, दागिन्यांची बॅग शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथक तयार करण्यात आली. लवकरच याबाबत ठोस पुरावे मिळतील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून रेल्वे स्थानकं, कोचमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. ही चोरी सुनियोजित असून प्रवासाशी परिचित असलेल्या संघटित टोळीने ती घडवून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.





