पुणे : पुणे विमानतळावर एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या वर्षा धुर्नलाल तुरकर यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, याप्रकरणी मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश अग्रवाल आणि मृत वर्षा तुरकर यांच्यात प्रेमसंबंध होते. ही बाब नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिला सहन झाली नाही. वर्षा यांचा कायमचा काटा काढण्यासाठी मोनाने हत्येचा कट रचला. तिने आपल्या शेजारी राहणाऱ्या कुणाल श्यामलाल कुंभलकर याच्या मदतीने शाह रुख खान फिरोज खान पठाण याच्याशी संपर्क साधला आणि या हत्येसाठी 13 लाख रुपयांची सुपारी ठरवली.ही सुपारी देऊन आपल्या पतीच्या प्रेयसीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,हा थरार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या सुमारास घडला. तिरोडा तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडराणी जंगल परिसरात वर्षा तुरकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 6 विशेष पथके तयार करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी गोंदिया आणि शेजारील बालाघाट जिल्ह्यात शोधमोहीम राबवली. तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी ते गोंदिया या मार्गावरील सुमारे 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सलग 4 दिवस तपासण्यात आले. एका कॅमेऱ्यात हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसल्याने तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रथम इम्रान करीम शेख याला ताब्यात घेतले.
इम्रानच्या कसून चौकशीत शाहरूख पठाणने सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी शाहरूख, कुणाल कुंभलकर आणि कट रचणारी मोना अग्रवाल अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर 2 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.






