उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्हा येथे एक (UP News) अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्या मंदिरात काही दिवसांपूर्वी लग्न करून नव्या (Sitapur News) आयुष्याची सुरुवात केली, त्याच मंदिराच्या परिसरात एका नवविवाहित जोडप्याने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी हरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अनिया कला गावात असलेल्या प्रसिद्ध महामाई मंदिर परिसरात या जोडप्याचे मृतदेह झाडाला एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. (Latest Marathi News)

मृतांची ओळख खुसीराम (वय 22) आणि त्याची पत्नी मोहिनी (वय 19) अशी झाली आहे. दोघेही बस्ती पूर्वा, लहरपूर येथील रहिवासी होते. विशेष म्हणजे, केवळ 22 दिवसांपूर्वीच या जोडप्याने याच महामाई मंदिरात वैदिक पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली होती, मात्र इतक्या कमी कालावधीत त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुसीराम आणि मोहिनी यांचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. ते नातेवाईक असल्याने सुरुवातीला दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरोध होता. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता 6 डिसेंबर रोजी दोघांनी घर सोडून महामाई मंदिरात लग्न केले होते. काही दिवस तणाव असला तरी नंतर कुटुंबीयांनी हे नाते स्वीकारल्याची माहिती आहे. लग्नानंतर दोघे लहरपूर येथील घरात राहत होते.
रविवारी सकाळी ग्रामस्थ पूजेसाठी मंदिरात गेले असता, मंदिराच्या आवारातील झाडाला पती-पत्नीचे मृतदेह दिसून आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हरगावचे निरीक्षक बलवंत शाही यांनी सांगितले की, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. लग्नाच्या अवघ्या 22 दिवसांत असा निर्णय का घेतला, यामागे मानसिक ताण, कौटुंबिक दबाव की अन्य काही कारण आहे, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







