Sharad Pawar : राज्यात आज निवडणूक आयोगाकडून एकूण २९ महानगरपालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, या घोषणेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. धुळ्याच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पना महाले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने शहरात भाजपचे पारडे जड मानले जात आहे. महाले यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि कैलास मराठे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Sharad Pawar)

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिकांसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. या इनकमिंगचा सर्वाधिक फटका शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बसल्याचे चित्र आहे.
पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका शक्य तिथे युतीमध्येच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घ्यायचे नाहीत, असेही महायुतीमध्ये ठरल्याचे फडणवीस यांनी सांगितले.






