नवी दिल्ली: दिल्लीतील काकडडूमा कोर्टातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई (Chief Justice B. R. Gavai) यांच्यावर बूट फेकून देशभरात खळबळ माजवणाऱ्या वकील राकेश किशोरला आज मंगळवारी न्यायालय परिसरात काही वकिलांच्या गटाने चप्पलांनी चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. (Rakesh Kishore Viral Video)

घटनेच्या वेळी राकेश किशोर कोर्टात उपस्थित होता. त्याला पाहताच काही वकील त्याच्यावर धावून गेले आणि धक्काबुक्की करत चप्पलांनी मारहाण केली. परिस्थिती बिघडू नये म्हणून कोर्टातील सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत राकेशची सुटका केली.
काही दिवसांपूर्वी राकेश किशोरने माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकला होता. या कृतीने देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र, स्वतः गवई यांनी त्याला क्षमा केली होती. तरीही कोर्ट परिसरात अशा प्रकारची मारहाणाची घटना घडल्याने कायदा व्यवस्थेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.







