लोणी काळभोर: पुणे–सोलापूर महामार्गावर (Pune News) ट्रॅक्टरमधून ऑइल गळती होऊन रस्त्यावर ऑइल सांडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरल्याची घटना घडली. बुधवारी (ता. 17) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मधुबन कार्यालयासमोर हि घटना घडली होती.

या घटनेची माहिती हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अनिल गायकवाड यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुकाळे यांच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले.
दरम्यान, ट्रॅक्टरमधून ऑइल गळती होत असल्याची माहिती काही वाहनचालक व नागरिकांनी चालकाला देऊनही ट्रॅक्टर न थांबल्याने ऑइल गळतीचा पट्टा लांबपर्यंत पसरला. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरले, तसेच एक महिला पोलीस कर्मचारीही या ऑइल गळतीमुळे घसरल्याची घटना घडली.
दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र वाहतूक शाखेचे हवालदार अनिल गायकवाड यांनी वेळीच हस्तक्षेप करून ऑइलवर माती टाकल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. हवालदार अनिल गायकवाड यांनी दाखवलेल्या तत्परतेचे व नागरिकांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






