Pune News: पुणे : पुणे महापालिका मुख्य इमारतीत गुरुवारी दोन कर्मचाऱ्यांना ह्रदविकाराचा झटका आला. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेकडे रुग्णवाहिका असतानाही त्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारात उशीर झाला आणि याचा जीवाला बळी जावे लागल्याचा आरोप पुढे येत आहे.

हेही वाचा- महसूल खात्याचा ऐतिहासिक निर्णय; १५ रुपयांत मिळणारा डिजिटल ७/१२ , बावनकुळेंची मोठी घोषणा!
महापालिकेतील कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहता, मुख्य इमारतीत कायमस्वरूपी डॉक्टर आणि कार्डिअॅक रुग्णवाहिका असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता पथ विभागातील शिपाई अशोक दशरथ वाळके (वय 58) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या वेळी महापालिकेतील डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले, मात्र रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवावे लागले. येथे उपचार सुरू असतानाच जवळपास चार तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे महापालिकेतील वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. पीएमसी इमारतीत कायमस्वरूपी डॉक्टर व त्वरित कार्डिअॅक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.






