पुणे: पुणे शहरात पीएमपीएल बसच्या धडकेत आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या कुटुंबाला लोकअदालतीने मोठा दिलासा दिला आहे. जून 2024 मध्ये विकासला पुलगेट बसस्थानकावर उभा असताना, चुकीच्या दिशेने आलेल्या पीएमपीएल बसचा धक्का बसला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे विकासच्या आई आणि वडील यांचा आधार हिरावला गेला. या दुर्घटनेमुळे मुलाला गमावलेल्या कुटुंबाला आता 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकअदालतीमध्ये अपघात नुकसानभरपाईचा दावा यशस्वीपणे निकाली काढण्यात आला आहे.

या अपघातानंतर विकासच्या आई-वडिलांनी त्यांचे वकील विकी नवले यांच्यामार्फत पीएमपीएल (PMPL) आणि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. विकास (बदललेले नाव) हा शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही एका खासगी दुकानात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि त्याचबरोबर बीएडचे शिक्षणही घेत होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते.
लोकअदालतीमध्ये अर्जदारांचे वकील विकी नवले आणि विमा कंपनीचे वकील सुरेंद्र दातार यांनी या दाव्यावर यशस्वी तडजोड घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लोकअदालतीमध्ये न्यायाधीश सी. पी. भागवत आणि वकील अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर हा महत्त्वाचा दावा निकाली काढला.







