पुणे: यवत व परिसरातील प्रवाशांना (Pune News) थांबण्यासाठी उभारलेल्या (Yavat News) बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे हा बसथांबा चक्क पार्किंगसाठी वापरला जात असल्याचे चित्र यवत येथे दिसून येत आहे. बस थांबा हे वाहनतळ झाल्याने यवत व आजूबाजूला असलेल्या अनेक गावातील विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार यांना पुणे शहर व उपनगरात जाण्यासाठी नागरिकांना बस मिळविण्यासाठी भर रस्त्यात थांबावे लागत असून, या अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर ना ग्रामपंचायत ,ना पीएमपी कारवाई करत आहे ना वाहतूक पोलीस. तर याठिकाणी असलेल्या उभारलेल्या शेडची मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे हे बसथांबे काढून तरी टाका, अशा संतापजनक भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.

प्रवाशांच्या सुविधांसाठी पीएमपीकडून बसथांबा उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबल्यास वाहतूककोंडी होऊ नये म्हणून थांबा उभारण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी नियमित वर्दळ आहे, तसेच पार्किंगसाठी जागा मिळत नाही, त्या ठिकाणी चक्क या बसथांब्यांवर अतिक्रमण करण्यात आले असून, थेट प्रवासी थांबण्याच्या जागेवरच वाहने पार्क केली जात आहे.
विशेष म्हणजे या दुचाकी, चारचाकी, तर त्यात कमी म्हणून काय की मोठी वाहने थांबेही त्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. या वाहनांच्या आड प्रवासी थांबल्यास बसचालकाला अनेकदा ते दिसत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी पार्किंग केली आहे, त्या ठिकाणी न थांबता प्रवासी थेट रस्त्याच्या मध्यभागीच जीव मुठीत घेऊन थांबत आहेत. तर दुसरीकडे भर वर्दळीच्या रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी पीएमपी बस रस्त्याच्या मधोमध थांबत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
बसथांब्यांवर गाड्या लावल्याने एक प्रकारे वाहतूककोंडी तसेच वाहतुकीसही अडथळा होतो. त्यामुळे अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, काही बसथांब्यांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर ज्या पीएमपीचे हे प्रवासी आहेत, त्यांच्या या गैरसोयीकडे लक्ष देण्यासाठी पीएमपीलाही वेळ नाही त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार कोण, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
फलक लावावे व स्वच्छता करावी
बस थांबावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केली जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी नो पार्किंगचे व बसच्या वेळेचे फलक लावावेत व बसण्यासाठी असलेल्या शेडची स्वच्छता करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.
ज्येष्ठांना करावा लागतो उभा राहून प्रवास
यवत व परिसरातील अनेक जण हडपसर असा प्रवास करत असून यामध्ये विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक हे देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात परंतु वरवंड, पाटस व न्हावरे येथील येणाऱ्या अनेक बस या प्रवाशांनी भरून येत असल्याने यवत येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना उभा राहूनच प्रवास करावा लागतो यासाठी सकाळी ,दुपारी व संध्याकाळी अशा तिन्ही वेळी यवत ते हडपसर व हडपसर ते यवत अशी स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे.







