पुणे: पुण्यातील (Pune News) रहिवाशांना दररोज होणारी वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. शहराची वाढलेली लोकसंख्या, रस्त्यांची अपुरी क्षमता आणि वाढत्या वाहनांमुळे ही कोंडी आता नित्याची झाली आहे. या समस्येवर प्रभावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मेट्रो रेल्वेचा विस्तार महत्त्वपूर्ण ठरत आहे.

महत्त्वाची बातमी म्हणजे नुकतेच केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अंतिम मंजुरी दिली आहे. या टप्प्यात लाईन 4 खडकवासला ते खाराडी आणि लाईन 4A नाल स्टॉप ते माणिक बाग या दोन महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.
पुणे मेट्रो फेज-2 अंतर्गत सुरू होणारी मेट्रो लाईन 4, शहराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भागांना जोडण्याचे मोठे काम करणार आहे. खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा नवीन मेट्रो मार्ग पुणे शहरासाठी लाइफलाईन ठरणार आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कॉरिडॉर एकत्रितपणे सुमारे 31.64 किलोमीटर लांबीचे असतील आणि यावर एकूण 28 अत्याधुनिक स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. आयटी हब असलेल्या खराडी, औद्योगिक क्षेत्र असलेल्या मगरपट्टा-हडपसर, स्वारगेट इंटरचेंज तसेच सिंहगड रोड आणि खडकवासला यांसारखी महत्त्वाची निवासी क्षेत्रे थेट जोडली जातील.
फेज-2 पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे अंदाजे 100 किलोमीटरपर्यंत पसरेल. यामुळे पुणे शहर, एवढे मोठे मेट्रो नेटवर्क असलेल्या देशातील मोजक्या शहरांमध्ये समाविष्ट होईल. या प्रकल्पामुळे हायवेवरील वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.







