पुणे: पुणे शहराला लंडन आणि न्यूयॉर्क यांसारख्या जागतिक पर्यटन केंद्रांच्या दर्जावर नेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आता एका महत्त्वपूर्ण प्रकल्पावर काम करत आहे. शहरभर पर्यटन वाढवण्याच्या उद्देशाने पीएमपीएल लवकरच ‘ओपन गॅलरी बससेवा’ सुरू करणार आहे. ‘मेक इन पीएमपीएल’ या संकल्पनेतून ही सेवा साकारली जाणार आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या आसपास अशा प्रकारची बससेवा उपलब्ध आहे, पण पुणे शहरासाठी ‘ओपन गॅलरी बस’ प्रथमच सुरू होत आहे. या विशेष पर्यटन बसचे काम सध्या पीएमपीएल च्या कार्यशाळेत पीएमपीएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.
ही बस पुणे शहरातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे, जुन्या वास्तुकला शैलीतील इमारती आणि प्रमुख पर्यटन केद्रांना भेट देण्यसाठी आणि पुण्यातील पर्यटन वाढवण्याच्या उद्देशाने तयार केली जात आहे.
या बसमध्ये प्रवाशांना ओपन डेकवर बसून प्रवास करण्याची संधी मिळेल. लंडनमध्ये ‘लंडन आय’ जवळ पर्यटकांना ओपन गॅलरी बसमध्ये बसून जसा फिरण्याचा अनुभव मिळतो, तसाच आनंद आता पुणेकरांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
प्रशासनाकडून मार्गातील आवश्यक अडथळे दूर करून तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यावर ही बससेवा पुणेकरांसाठी खुली होईल. शहराच्या पर्यटनासाठी ही ‘ओपन गॅलरी बससेवा’ गेमचेंजर ठरेल आणि त्यातून पीएमपीएलच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होईल.







