Pune MHADA : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या सुमारे ४,४०० घरांच्या सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील चार–पाच दिवसांत सोडत घेण्याचा म्हाडाचा प्रयत्न असून, दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यास आवश्यक परवानगी घेऊनच सोडत जाहीर केली जाईल, असे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. या सोडतीसाठी तब्बल २ लाख १५ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत आणि त्यांची पडताळणी सुरू असल्याने सोडतीला उशीर झाला आहे. (Pune MHADA)

अर्ज व अनामत रकमेची नोंदणी ११ सप्टेंबरपासून सुरू झाली होती. कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणांमुळे अर्ज करण्याची मुदत दोनदा वाढवावी लागली, आणि अंतिम मुदत ३० नोव्हेंबर ठेवण्यात आली. प्रत्येकी ७०८ रुपये शुल्क व २० हजारांची अनामत रक्कम अशी व्यवस्था ठेवण्यात आली होती. या सर्व अर्जदारांकडून म्हाडाकडे सुमारे ४४७ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली आहे.
अर्जांची संख्या विक्रमी असल्याने प्रत्येक अर्जाची, विशेषत: वेगवेगळ्या आरक्षणांनुसार आलेल्या कागदपत्रांची, संबंधित विभागांकडून बारकाईने पडताळणी चालू आहे. ही प्रक्रिया शनिवारपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर सोडतीची तारीख १६ किंवा १७ डिसेंबर निश्चित करण्याची तयारी आहे, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली.







